वाघा बॉर्डर : पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना हुसकावून लावणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी पाकिस्तानातून भारताच्या भूमीत पाऊल टाकले.
पाकच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन वर्धमान यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले. तेथून त्यांना लगेचच अमृतसरला नेण्यात आले. तिथे त्यांचे आई-वडील वाट पाहत होते. तेथून ते सर्व जण हवाई दलाच्या विशेष विमानाने अधिकाऱ्यांसह दिल्लीकडे रवाना झाले. ते दिल्लीच्या पालम विमानतळावर नेण्यात आले. पालम विमानतळ हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आहे. तिथे ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तिथेही त्यांच्या स्वागतासाठी हवाई दलाचे, तसेच लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी भारतीय भूमीत प्रवेश केला, तेव्हा त्यांनी निळ्या रंगाचा कोट घातला होता. त्यांच्या चेहºयावर हास्यही दिसत होते. मात्र, गंभीरपणे ते साºया औपचारिक प्रक्रियांना सामोरे गेले. ते भारतात आल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून दिसताच भारताच्या अनेक भागांत फटाके वाजवण्यात आले आणि मिठाईही वाटण्यात आले. रात्री अनेक शहरांत लोक भारतीय तिरंगा फडकावून आणि ‘भारत माता की जय’ चा जयजयकार करताना दिसत होते.
पाकिस्तानमधून भारतीय भूमीवर प्रवेश करताना, ते अतिशय आत्मविश्वासाने चालताना दिसत होते. त्यांच्यासोबत हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन थॉमस जॉय कुरियन तसेच भारताचे पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षण विभागाचे अधिकारी होते. तसेच काही पाकिस्तानी अधिकारीही होते.भारतीय सीमेवर ते जेमतेम पाचच मिनिटे होते. तेथून हवाई दलाच्या कारमधून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अमृतसरला नेले. ते २९ किलोमीटरचे अंतर पार करायला त्यांना सुमारे अर्धा तास लागला. ते अमृतसरला पोहोचले, तेव्हा ९ वाजून ५0 मिनिटे झाले होते. विमानतळावरच ते जेवतील, असे आधी ठरले होते. पण नंतर हवाई दलाच्या विमानातच जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पालम विमानतळावर साडेदहा वाजण्याच्या सुमारात पोहोचणार होते. त्यामुळे पंतप्रधान विमानतळावरून निघून गेल्यानंतर हवाई दलाचे विमान तिथे पोहाचले.
दिल्लीत पोहोचताच, त्यांना लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती तपासण्यात आली. त्यांच्या शरीरावर जखमा आहेत का, त्या कशामुळे झाल्या आहेत, ही सर्व माहिती तेथील डॉक्टरांनी घेतली. तसेच काही उपचारही करण्यात आले. ते मानसिकरित्या शांत आहेत ना, हेही डॉक्टरांनी तपासले. अर्थात ते भारतात अतिशय धिरोदात्तपणे आले होते. त्यामुळे केवळ उपचार म्हणून हे सारे करण्यात आले.
वाघा बार्डर तिथे उपस्थित असलेल्या हजारो भारतीयांना परत जाण्याची विनंती करण्यात आली. पण तरीही तेथून लोक हलायला तयार नव्हते. अभिनंदन यांचे आगमन होणार असल्याने या सीमेवर रोज संध्याकाळी होणारा बिटिंग द रिट्रीट हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. तरीही वाघा बॉर्डरच्या परिसरात सुमारे २५ हजार लोक उपस्थित होते. पण अभिनंदन आले, तेव्हा त्यांना जवळ येऊ ही दिले नाही. त्यामुळे हे लोक तिथे असूनही या भारतीय वाघाला पाहू शकले नाहीत. त्यांची कार जातानाच त्यांना पहायला मिळाले.