लखनौ - यवतमाळमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला शुक्रवारी ठार करण्यात आलं. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. मात्र 'अवनी'च्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमध्ये दुधवा व्याघ्रप्रकल्पात ग्रामस्थांनी एका वाघिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वाघिणीने गावातील एका ग्रामस्थावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ग्रामस्थाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेले ग्रामस्थ दुधवा व्याघ्रप्रकल्पात घुसले आणि तेथील वनसंरक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच वनसंरक्षकांकडून ट्रॅक्टर हिसकावून घेऊन वाघीण दिसताच तिच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. ग्रामस्थांनी रागाच्या भरात जखमी वाघिणीला काठ्यांनी मारहाण करून ठार केलं.
वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वाघीण 10 वर्षांची होती. आतापर्यंत वाघिणीने कुणालाही जखमी केलेलं नाही. वाघिणीची हत्या करणाऱ्या ग्रामस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर ग्रामस्थांनी वाघिणीने गेल्या काही दिवसात ग्रामस्थांवर तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच तिला ठार केल्याचं म्हटलं आहे.