पिलीभीत : येथे एका भिंतीवर तब्बल १० तासांपासून बसून असलेल्या वाघिणीला १२ तासांच्या प्रयत्नानंतर ताब्यात घेण्यात यश आले आहे. या वाघिणीला पाहण्यासाठी शेकडो स्थानिकांनी गर्दी केली होती. यावेळी एका गावकऱ्याने वाघिणीला धक्का देण्याचा, शेपटी ओढायचाही प्रयत्न केला.
व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक नवीन खंडेलवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास वाघिणीला पिंजऱ्यात सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले. तिला बेशुद्ध करण्यासाठी एकूण चार डॉट देण्यात आले.
गाडीवर उडी मारली…
व्याघ्र प्रकल्पाच्या माला रेंजपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अटकोना गावात वाघिणीने प्रवेश केला. त्यानंतर शेतकरी सुखविंदर यांच्या गाडीवर रात्री १२ वाजल्यानंतर वाघिणीने त्यांच्या गाडीवर उडी मारली आणि जोरजोरात गर्जना केली.
लोकवस्तीत येताहेत वाघ
एक गावकरी वाघिणीजवळ गेला आणि तिला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी हटवले. लोकांनी या वाघिणीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. गेल्या अनेक दिवसांपासून ‘पिलीभीत व्याघ्र प्रकल्पा’ला लागून असलेल्या लोकवस्तीत वाघ येत आहेत.
बेशुद्ध होण्याचे इजेंक्शन तिला नकाे होते…
वनविभागाच्या पथकाने तिला वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. या वेळी तिला डॉट देण्यात आला, परंतु यातील एक डॉट तिने तोंडाने काढून टाकला. चौथ्या डॉटने ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने वाघिणीला पिंजऱ्यात कैद करून आपल्यासोबत नेले.