कौतुकास्पद! 39 वर्षांपासून गावात एकही गुन्हा नाही; लोकांनी कोर्ट-पोलीस स्टेशन पाहिलंच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:26 AM2022-06-17T08:26:25+5:302022-06-17T10:52:44+5:30
गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत असतात. पण असं असताना एक कौतुकास्पद घटना आता घडली आहे. मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे गेल्या 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोक पंचायत भरवून परस्पर संमतीने प्रकरणे सोडवतात. त्यामुळे लोकांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरजच पडत नाही. ओरछा या धार्मिक आणि पर्यटन शहराजवळ वसलेले हाथीवर खिरक हे असं गाव आहे की, जिथे गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही.
पोलीस ठाण्यात 39 वर्षांत आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोकही पोलीस ठाणे आणि न्यायालयापासून लांब राहतात. जेव्हा पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल या गावात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की गावातील लोक पोलिसांना ओळखत नाहीत. प्यारी बाई पाल या 100 वर्षांच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिने गावात कधीही वाद पाहिलेला नाही. पोलीस गावात आले आहेत. पोलीस कसे असतात हे तिला माहीत नाही. गावात कोणताही वाद नसल्याचे गावातील अनेक ज्येष्ठ व तरुण सांगतात. किरकोळ वाद असतील तर ते गावातील ज्येष्ठ मंडळी पंचायत स्तरावर परस्पर संमतीने सोडवतात.
पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मला कळले की या गावात 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही, तेव्हा हे गाव पहिलं. तिथल्या लोकांशी बोलून व्हिलेज क्राइम नोटबुक तपासले असता 1983 पासून इथे एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली. शांतताप्रिय असलेल्या या गावात एक व्यक्ती असामाजिक स्वभावाचा होता पण तो आता गावात राहत नाही. हाथीवर खिरक गावात 225 लोक राहतात. कमी लोकवस्ती असलेल्या या गावात शांतता आणि आनंददायी वातावरण आहे.
गावात पाल आणि अहिरवार बा ब्राह्मण समाजाचे लोक राहतात. सर्व समाजातील लोक परस्पर बंधुभावाने मिळून मिसळून राहतात. सुख-दुःखात नेहमी एकमेकांना साथ देतात. दुरावा, वाद यांसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी जेष्ठ मंडळी समजूत घालून शांत करतात. हाथीवर खिरक गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसोबतच शेळी, गाय यांसारखे प्राणी पाळणे हा आहे. शेळीपालनामुळे त्यांना रोजगार मिळतो, त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्नही मिळते. गायींच्या संगोपनामुळे गावातील लोकांना दुधाची कमतरता भासत नाही. गावातील लोकही तूप, दुधाचा व्यवसाय करतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.