नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी लोकांना संबोधित करताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली आणि त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले,"पंतप्रधान मोदी फक्त दहशतवादावर बोलतात, पण आजपर्यंत भाजपचा एकही नेता दहशतवादी हल्ल्यात मारला गेला नाही. भाजपकडून सतत सांगितले जाते की आम्ही दहशतवादाला प्रोत्साहन देतो, पण आमच्या काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दोघेही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले."
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बंगळुरू पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्यात सरकार स्थापनेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तरीही डीके शिवकुमार या कामगिरीवर जास्त खूश दिसून येत नाहीत.
डीके शिवकुमार म्हणाले, "आम्ही विधानसभा निवडणुकीत 135 पेक्षा जास्त जागा जिंकल्या, पण मी त्यावर खूश नाही. माझ्या किंवा सिद्धरामय्यांच्या घरी येऊ नका. आमचे पुढचे लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे आणि त्यासाठी आपण चांगले लढले पाहिजे." दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी आणि डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.