ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.या प्रकरणी जोधपूर उच्च न्यायालयाने सलमानची सुटका केली असली तरी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली असून या प्रकरणी सलमान खानला नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही.
1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान, सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. बिष्णोई समाजाने केलेल्या तक्रारीनंतर 2 ऑक्टोबर 1998 रोजी याप्रकरणी सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुर्वी याप्रकरणी सलमानने 5 दिवसांसाठी तुरूंगवासही भोगला आहे.