कांचीपुरम् : येथील कुमारकोट्टम् मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी मंगळवारी सकाळी एका रशियन पर्यटकास भीक मागताना पाहून भाविकांना आश्चर्य वाटले. अगतिकता म्हणून लोकांपुढे हात पसरण्याची त्याच्यावर वेळ आली हे नंतर स्पष्ट झाले.ए. इव्हँगेलिन असे या २४ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. टोपी हातात घेऊन तो भीक मागत होता. अनेकांनी त्याच्या टोपीत पैसे टाकले.थोड्याच वेळात ही बातमी शिव कांची पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेले. त्याच्याकडे रशियाचा पासपोर्ट व भारताचा वैध पर्यटक व्हिसा असल्याचे दिसून आले. इव्हँगेलिन याने पोलिसांना सांगितले की, २४ सप्टेंबर रोजी तो भारतात आला. चेन्नईहून कांचीपुरम्ला येऊन त्याने काही मंदिरात दर्शन घेतले. नंतर तो पैसे काढण्यासाठी एका एटीएममध्ये गेला. परंतु ‘पिन लॉक’ झाल्याने त्याला पैसे काढता आले नाहीत. चेन्नईला परत जाण्यासाठी पैसे नसल्याने नाइलाजाने त्याने लोकांपुढे हात पसरण्याचे ठरविले. अखेर पोलिसांनी या पर्यटकाला प्रवासापुरते पैसे दिले व चेन्नईला रवाना केले. (वृत्तसंस्था)
रशियन पर्यटकावर आली भिक मागायची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:52 AM