Delhi CM : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार अशी चर्चा सुरू झालेली असताना अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला. दोन दिवसांत राजीनामा देणार, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीच्या उपराज्यपालांकडे अरविंद केजरीवाल यांना राजीनामा सादर करावा लागणार आहे. दरम्यान, यासंदर्भात सूत्रांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
केजरीवाल उपराज्यपालांना कधी भेटणार?
अरविंद केजरीवाल मंगळवारी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांनी केजरीवालांना भेटीसाठी वेळ दिली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वत्त दिले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता भेटीसाठी वेळ दिल्याचे पीटीआयने म्हटले आहेत.
राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीतील बदलले दिल्लीतील राजकारण
३० ऑगस्ट रोजी भाजपाच्या दिल्लीतील आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री तुरुंगात असल्याचा मुद्दा अधोरेखित भाजपा आमदारांनी दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.
भाजपा आमदारांनी दिलेले पत्र राष्ट्रपती भवनाने केंद्रीय गृह सचिवांकडे पाठवले होते. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन दिला. बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आणि दिल्लीतील राजकारण बदलून गेले.
नव्या मुख्यमंत्र्याबद्दल उत्सुकता
अरविंद केजरीवालांनी राजीनाम्याची घोषणा करताना मनिष सिसोदिया मुख्यमंत्री होणार नाही, हेही स्पष्ट केले. सध्या आम आदमी पक्षाच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. नव्या मुख्यमंत्र्याबद्दल बैठकांत चर्चा सुरू आहे. काही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.