ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - राष्ट्रगीत चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर त्यासाठी उभं राहण बंधनकारक नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच चित्रपट सुरु झाल्यानंतर त्यामध्ये राष्ट्रगीत वापरले असल्यास त्यासाठी उभं राहणं बंधनकारक नसणार आहे. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला लावण्यात येणा-या राष्ट्रगीतासाठी उभं राहावं असं न्यायालयाने सांगितलं आहे. सोबतच राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं की नाही यावर चर्चा करणं गरजेचं असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायालय हा नैतिकतेचा पहारेकरी नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. दुसरीकडे राष्ट्रगीतासाठी उभं न राहिल्यास त्याविरोधात कारवाई करणारा कोणता कायदा नसल्याचं केंद्राने सांगितलं आहे.
काही महिन्यांपुर्वी देशभरातील सर्व चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत बंधनकारक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सोबतच स्क्रीनवर तिरंगा दाखवण्यात यावा असंही आदेशात सांगण्यात आलं होतं. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर चित्रपटगृहात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उभं राहून राष्ट्रगीताचा मान राखावा असं या आदेशात सांगितलं होतं. तसंच आपल्या फायद्यासाठी राष्ट्रगीताचा वापर करण्यात येऊ नये असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.