भोपाळ : 1992मध्ये कारसेवकांनी मशीद नव्हे तर राम मंदीर पाडल्याचा दावा द्वारकापीठचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. रामजन्मभूमीत कधी मशीद अस्तित्वातच नव्हती. 1992 मध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून मंदीर पाडण्यात आले असा दावा शंकराचार्यांनी केला आहे. त्यांनी हा दावा अयोध्येच्या वादावरुन भोपळमध्ये माध्यमांशी बोलताना केला आहे.
ते म्हणाले की, रामजन्मभूमीवर मशीद कधी नव्हतीच आणि तशा काही खूनाही नाहीत. ज्यावरुन आपण असे म्हणू की तिथे मशीद होती. कारसेवकांनी त्यावेळी मंदीर तोडले होते. ते म्हणाले की, बाबरनामा आणि आईने अकबरीमध्ये राम मंदिराच्या ठिकाणी मशीद होतं असा उल्लेख नाही. न्यायालयाने सध्याच्या जमिनीवरची स्थगिती उठवल्यानंतर त्याजागी भव्य राम मंदीर उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मी नरेंद्र मोदी किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात जेव्हा बोलतो तेव्हा लोक मला काँग्रेसचे समर्थक म्हणतात. मी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी काँग्रेस ब्रिटीशांविरोधात लढा देत होते. मी आज एक धर्मगुरु आहे. शंकराचार्य आहे. सनातन धर्माचे रक्षण करणे हे माझे काम असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीची सुनावणी सुरु आहे. तसेच भ्रष्टाचार हा देशातला सर्वांत मोठा प्रश्न असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर गावातल्या पंचायत निवडणुकांसाठीसुद्धा खर्च केला जातो. एफआयआर दाखल करुन घेण्यासाठीसुद्धा पोलिसांना लाच दिली जात असल्याचे शंकराचार्य म्हणाले.