भोपाळ : काठावरचे बहुमत मिळवत साधारण सव्वा वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने १९ आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.
सरकार अल्पमतात गेल्याने काय पावले उचलायची, यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्यावर कमलनाथ यांनी सरकारला धोका नसल्याचा दावा केला. काँग्रेस आमदार अर्जुन सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या काँग्रेस सोडण्याने काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि कमलनाथ यांचे सरकार कायम राहणार आहे. येत्या 16 मार्च रोजी तुम्हाला हे दिसून येईल. काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला पूर्वीऐवढीच दिसून येईल, असा दावा आमदार अर्जुन सिंग यांनी केला आहे. तसेच राजा-महाराजांचा काळ जावून कित्येक दिवस उलटले आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जाण्याने सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याचे अर्जुन सिंग यांनी म्हटले आहे.
230 सदस्यीय मध्यप्रदेश विधानसभेत दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे 228 सदस्यांपैकी 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे विधानसभा सदस्य संख्या केवळ 206 वर येणार आहे. आता बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 104 आमदार लागणार आहेत. तर काँग्रेसकडे केवळ 92 आमदार राहणार आहेत. काँग्रेसला सध्या तरी सपा, बसपाच्या आमदारांचा पाठिंबा आहे.