मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर डॉ. मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाली, तेव्हा डॉ. मोहन यादवच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही आश्चर्य वाटलं. कारण कोणालाच याची कल्पना नव्हती. डॉ. मोहन यादव यांची डॉक्टर मुलगी आकांक्षा यादव हिने आजतकशी बोलताना सांगितलं की, वडील मुख्यमंत्री झाल्याचं समजलं तेव्हा ती ऑपरेशन करत होती.
आकांक्षा हिने आधी कर्तव्य बजावलं, रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि नंतर घरी जाऊन आनंदोत्सव साजरा केला. आकांक्षा हिने सांगितले की, हॉस्पिटलपासून घरापर्यंत संपूर्ण वातावरण आनंदाने भरलेले होतं. कोणी ढोल वाजवत होतं, तर कोणी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून मोठ्या उत्साहात आनंद साजरा करत होतं. मोहन यादव यांच्या कुटुंबात वडील, पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी आहे.
मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये मंत्री होते. भाजप हायकमांडने मनोहर लाल खट्टर, डॉ. के. लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांना मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. या निरीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांचे नाव निश्चित करण्यात आले. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे दोन उपमुख्यमंत्री असतील यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत मोहन यादव?
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.