नवी दिल्ली : आम्ही दिल्लीतील सातच्या सात लोकसभेच्या जागा जिंकल्या असत्या. पण आयत्या वेळी डाव पलटला. आम आदमी पक्षाला मिळणारी सारी मते अचानक काँग्रेसकडे गेली, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्हाला सर्व सात जागा जिंकण्याची खात्री होती. पण आयत्या वेळी ‘आप’ मते काँग्रेसकडे गेली. हे सारे निवडणुकीच्या एक दिवस आधी घडले. दिल्लीतील मुस्लिमांची मते काँग्रेसकडे का व कशी गेली याचा आम्ही अभ्यास करीत आहोत. दिल्लीत मुस्लिम समाजाची सुमारे १३ टक्के मते आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यास दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष व उमेदवार शीला दीक्षित यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, केजरीवाल असे का सांगत आहेत, हे समजत नाही. प्रत्येक पक्षाला सर्वांची मते मागण्याचा अधिकार आहे आणि कोणाच्याच मतांवर कोणताही पक्ष आपला हक्क सांगू शकत नाही. कोणत्याही पक्षाची अशी स्वत:ची हक्काची मते नसतात. तुमच्या सरकारचे कामकाज न आवडल्यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली आहेत. त्याबद्दल केजरीवाल यांनी कुरकुर करण्याचे कारण नाही.
यावेळी आप व काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चेचे गुºहाळ बराच काळ चालले. पण समझोता झालाच नाही. आता मात्र भाजप, आप व काँग्रेस अशा तिरंगी लढतीमुळे काय होईल, हे सांगणे अवघड आहे. बहुधा तीच धास्ती केजरीवाल यांना वाटत असावी. आप व काँग्रेस यांना २0१४ साली दिल्लीतील एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. सर्व जागी भाजपचा विजय झाला होता. मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकांत ७0 पैकी ६७ ठिकाणी केजरीवाल यांच्या पक्षाने बाजी मारली.
आमचा पक्ष कोणत्याही स्थितीत मोदी व शहा यांना पाठिंबा देणार नाही. त्यांच्याव्यतिरिक्त जे सरकार स्थापन करू शकतील, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यास जे वचनबद्ध असतील, त्यांनाच पाठिेंबा असेल, असे केजरीवाल यांनी पुन्हा स्पष्ट केले.भाजपवाले माझ्या जिवावर उठलेत!भाजप माझ्या जिवावर उठली असल्याने माजी पंतप्रधान इंदिरागांधी यांच्याप्रमाणे सुरक्षा रक्षकांकडून माझी हत्या घडवून आणली जाईल, असा दावाही केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की, माझे सुरक्षा कर्मचारीही भाजपच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांच्या करवी माझी हत्या केली जाईल. दिल्लीत रोडशोमध्ये एकाने केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली होती. पोलिसांच्या मते तो ‘आप’चाच असंतुष्ट कार्यकर्ता होता. पण ‘आप’ने मात्र तो हल्ला भाजपने केल्याचा आरोप केला होता.