Delhi Amusement Park Accident: २४ वर्षीय प्रियंकाचं निखीलसोबत लग्न ठरलं होतं. दोघेही एकमेकांना जाणून घेण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवत होते. गुरुवारी सायंकाळी दोघेही दक्षिण पश्चिम दिल्लीतील वॉटर पार्कमध्ये गेले होते. तिथेच दोघे पाळण्यात बसले आणि क्षणाधार्त होत्याचं नव्हतं झालं. एका भयंकर दुर्घटनेत प्रियंकांचा मृत्यू झाला. दोघांचा संसार सुरू होण्याआधीच मोडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसहेडा परिसरात असलेल्या वॉटर पार्कमध्ये प्रियंकाचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला. प्रियंका होणारा पती निखील सोबत वॉटर पार्कमध्ये आली होती. दोघे पाळण्यात बसले.
वाचा >>सोलापुरात चिमुकलीसमोरच वडिलांनी आईला संपवलं अन् स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल
प्रियंका आणि निखील ज्या पाळण्यात बसले होते, तो वर गेल्यानंतर तुटला. त्यानंतर प्रियंका वरून कोसळली. इतक्या उंचीवरून पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर निखीलने प्रियंकाच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली.
निखील प्रियंका फेब्रुवारी २०२६ मध्ये करणार होते लग्न
२४ वर्षीय प्रियंका तिच्या कुटुंबासोबत चाणक्यपुरीतील विनय मार्गावरील सी-२ १६५ मध्ये राहत होती. प्रियंका एका खासगी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर होती. तिच्या कुटुंबात आईवडिलांसह एक बहीण आणि एक भाऊ आहेत.
प्रियंकाचा भाऊ मोहितने सांगितले की, प्रियंकाचे फेब्रुवारी २०२६ मध्ये नजफगढमधील निखीलसोबत लग्न ठरले होते. गुरुवारी दुपारी निखीलचा कॉल आला. त्यानंतर दोघेही दुपारी १ वाजता कापसहेडा वॉटर पार्कला गेले होते. पाळण्यात बसल्यानंतर ही दुर्घटना झाली आणि प्रियंका खाली पडली.
मोहितने आरोप केला की, वॉटर पार्कमध्ये कोणतीही व्यवस्था नाही. ती खाली पडली तेव्हा तिला उशिराने रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. प्रियंकाचा मृत्यू झाल्यानंतर पाळणा बंद करण्यात आला असून, त्याची दुरूस्ती केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.