एस. पी. सिन्हा। लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते तेजस्वीप्रसाद यादव यांना मंत्रिमंडळात ठेवावे वा ठेवू नये, मुख्यमंत्री याबाबत नितीशकुमार यांनी सर्वाधिकार देण्याचा निर्णय जनता दल (युनायटेड) च्या आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र तेजस्वीप्रसाद यांच्याबाबतीत राजदला निर्णय घ्यायला नितीशकुमार यांनी चार दिवसांचा अवधी दिल्याचे सांगण्यात येते. या काळात राजदने निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्री आपला निर्णय घेऊ शकतील. लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांवर सीबीआयने छापे घेतल्यापासून तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढावे, यासाठी नितीशकुमार यांच्यावर स्वपक्षीयांकडून दबाव वाढत आहे. दुसरीकडे तेजस्वीप्रसाद राजीनामा देणार नाहीत, असा निर्णय राजदच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळात ठेवणे, याचा अर्थ भ्रष्टाचारास पाठिंबा देणे होईल, असे जनता दल (युनायटेड) च्या मंत्री व आमदारांचे म्हणणे आहे.आम्ही आघाडीचा धर्म पाळतो. त्यामुळे तेजस्वीप्रसाद यांच्याबाबतीत राजदनेच निर्णय घ्यायचा आहे, असे जनता दल (यू)चे प्रवक्ते नीरज कुमार यांनी सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नांची थेट उत्तरे त्यांनी टाळली. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते रमई राम यांनी सांगितले की, तेजस्वीप्रसाद यांच्याबाबत राजदने चार दिवसांत निर्णय घ्यावा; अन्यथा नितीशकुमार काय तो निर्णय घेतील. बैठकीत भ्रष्टाचाराबाबत पक्षाने कडक भूमिका घ्यावी, कुठेही पक्षाने त्याचे समर्थन करता कामा नये, अशी चर्चा झाल्याचे आमदारांनी सांगितले.>भाजपा पाठिंब्यास तयारनितीशकुमार यांनी तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी मागणी बिहार भाजपने केली आहे. तसे केल्यामुळे सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाल्यास आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ , असे भाजपने म्हटले आहे. अर्थात हे सरकार पडावे, असाच भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
तेजस्वीप्रसाद यांना राजीनाम्यासाठी अवधी
By admin | Published: July 12, 2017 12:18 AM