PM Narendra Modi on Pahalgam Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीबिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहारच्या मधुबनी येथे विविध कामांच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी या सभेमध्ये आपल्या भाषणाच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळ मौन बाळगून पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. देशाच्या आत्म्याला दुखावणाऱ्या दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये सार्वजनिक व्यासपीठावर दिसले. या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला. पंतप्रधानांनी यावेळी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबद्दल भाष्य केले. त्यामुळे आता हे स्पष्ट झालंय की पहलगाममधील दहशतवाद्यांच्या कारवायीनंतर सरकार आता त्यांना योग्य उत्तर देण्याच्या तयारीत आहे.
"पहलगाम हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. सर्व पीडित कुटुंबियांच्या दुःखात सगळा देश त्यांच्यासोबत उभा आहे. ज्यांच्यावर उपचार चालू आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठीही सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा, भाऊ आणि जोडीदार गमावला. त्यातील प्रत्येक जण वेगवेगळे भाषिक होते. या सर्वांच्या मृत्यूवर आपल्या सर्वांचे दुःख, आक्रोश एकसारखा आहे. हा हल्ला फक्त पर्यटकांवरच झाला नाही तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. मी स्पष्ट शब्दात सांगतोय की, ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा मिळणारच. आता उरलेल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडण्याची वेळ आली असून त्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या प्रमुखांचे कंबरडे मोडून ठेवणार आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"आज बिहारच्या मातीतून मी संपूर्ण जगाला सांगतोय की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना शोधून काढेल आणि कठोर शिक्षा देईल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.