भाजपने गुरुवारी पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. काँग्रेस पक्षाचं तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे", असं विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे. काँग्रेसनं तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावं, असा सल्ला तृणमूलच्या नेत्यांनी काँग्रेसला देऊ केला आहे. ममता बॅनर्जीच भाजपाचा पराभव करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. "काँग्रेससारखा जुना पक्ष का नाहीसा होत आहे, हे मला समजत नाही. आम्हीही या पक्षाचा भाग होतो. काँग्रेसने टीएमसीमध्ये विलीन व्हावे. हीच योग्य वेळ आहे. मग राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांवर आपण (नथुराम) गोडसेच्या तत्त्वांना मात देऊ शकतो", असं तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्याचे परिवहन व नगर विकास मंत्री फिरहाद हकीम म्हणाले.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही हकीम यांच्याच प्रतिक्रियेची री ओढली. "काँग्रेस भाजपसारख्या शक्तीशी लढू शकत नाही, असे आम्ही खूप दिवसांपासून म्हणत आलो आहोत. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या नेत्याची गरज आहे. काँग्रेसने हे समजून घेतले पाहिजे", असं कुणाल घोष म्हणाले.
यापूर्वी, टीएमसीचे मुखपत्र असलेल्या 'जागो बांगला' मधूनही अनेकदा काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. "भाजपच्या विरोधात विरोधी शक्तींची एक शक्तिशाली युती बनवण्याऐवजी काँग्रेसनं स्वतःला केवळ ट्विटरवर मर्यादित ठेवलं आहे", अशी टीका या वृत्तपत्रातून काँग्रेसवर करण्यात आली होती. आपल्याला भाजपचा पर्याय हवा आहे, भाजपविरोधात आघाडी हवी आहे. असे आम्ही अनेकवेळा म्हटले आहे, अगदी काँग्रेसलाही याची कल्पना दिली आहे. पण त्याचं काहीच झालं नाही. आमच्या नेत्याने (ममता बॅनर्जी) युतीसाठी एक फ्रेमवर्क, एक सुकाणू समिती, धोरण आणि कृती मार्गाची मागणी केली आहे. मात्र, काहीही केलं गेलं नाही. काँग्रेस स्वतःला फक्त ट्विटरवर मर्यादित ठेवण्यात आनंदी आहे, असा घणाघाती हल्ला 'जागो बांगला' मधून करण्या आला होता.
तृणमूल काँग्रेस गोव्यात चांगलं प्रदर्शन करण्यात अपयशी ठरली आणि त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यांचा निवडणूक सहयोगी महाराष्ट्र गोमंतक पक्ष (एमजीपी) ने दोन जागा जिंकल्या असून ते भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे तृणमूलचे नेतेही चांगलेच संतापले आहेत. "आम्ही गोव्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि आम्हाला मिळालेल्या मताधिक्याने आम्ही समाधानी आहोत. परंतु, एमजीपीने काय निर्णय घेतला यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. त्या निर्णयाबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही", असं कुणाल घोष म्हणाले.
दरम्यान, बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी टीएमसीच्या प्रस्तावावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "टीएमसी भाजपचा सर्वात मोठा एजंट आहे. जर ते भाजपविरोधात लढण्यास गंभीर असतील तर त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे", असा प्रतिसल्ला अधीर रंजन चौधरी यांनी देऊ केला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या कामगिरीची मात्र भाजप नेतृत्वाने खिल्ली उडवली. "पुढील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. गुरुवारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की पश्चिम बंगालच्या बाहेर टीएमसी नाही. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आता पंजाबमध्येही सरकार स्थापन करेल. परिणामी, आता विरोधकांचा चेहरा कोण, ममता की केजरीवाल हे त्यांनीच ठरवावे", असं भाजपा प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार म्हणाल्या.