नवी दिल्ली: आयएएस अधिकारी टीना डाबी (IAS Tina Dabi) आणि अतहर आमीर (IAS Athar Aamir) तलाक घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मूळ भोपाळच्या रहिवासी असलेल्या टीना डाबी यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. तर याच परीक्षेत अतहर आमीर दुसऱ्या स्थानी होते. २०१८ मध्ये या दोघांनी निकाह केला. त्यांचं लग्न हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.यूपीएससी परीक्षेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्यांनी लगीनगाठ बांधल्यानं टीना आणि अतहर यांच्या निकाहाची बरीच चर्चा झाली. आता या दोघांनी जयपूरमधील कुटुंब न्यायालयात तलाकसाठी (Tina Dabi and Athar Aamir Talaq) अर्ज केला आहे. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर टीना आणि अतहरनं काश्मीरमधील पहलगाममध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. प्रशिक्षणदरम्यान टीना आणि अतहर जवळ आल्याची चर्चा होती.काश्मीरचे रहिवासी असलेले अतहर आमीर २०१५ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत दुसरे आले होते. आयएएसचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर टीना डाबी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये भिलवाडात एसडीएम म्हणून पदभार हाती घेतला. सध्या टीना अर्थ विभागात संयुक्त सचिव म्हणून काम करतात. तर आमीर ईजीएसचे सीईओ म्हणून कार्यरत आहे. टीना आणि आमीर सध्या जयपूरमध्ये वास्तव्यात आहेत.
IAS टीना डाबी-अतहर आमीर घटस्फोट घेणार; कोर्टात तलाकसाठी अर्ज दाखल
By कुणाल गवाणकर | Published: November 20, 2020 10:08 PM