tina dabi news : राजस्थानमधील प्रसिद्ध आणि डॅशिंग आयएएस अधिकारी टीना डाबी नेहमीच चर्चेत असतात. बुधवारी बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी एका स्पावर धाड टाकत मोठी कारवाई केली. सदर घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, या स्पामधून पाच तरुण आणि सात तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. चामुंडा सर्किल परिसरात हा स्पा असल्याचे कळते. सकाळी नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्या. जिल्हाधिकाऱ्यांना पाहताच स्पा चालकाने कुलूप लावून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा न उघडल्यास तोडून आतमध्ये शिरू अन्यथा इथेच थांबू असा इशारा दिला, डाबी यांनी दिला. याप्रकरणी सात जणांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, कायदेशीर कारवाई केली जात आहे.
'नवो बाडमेर' या अभियानाच्या माध्यमातून टीना डाबी शहरातील विविध ठिकाणांना भेट देत आहेत. बुधवारी सकाळी चामुंडा सर्किलजवळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होत्या. पण, त्यांना पाहून स्पा चालकाने मुख्य दरवाजा बंद केला. हे पाहताच टीना डाबी यांना संशय आला आणि अधिकाऱ्यांना या स्पावर छापा मारण्यास सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी स्पाचा दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, संबंधित स्पा चालकाने विरोध करत अर्धा तास सर्वांना तिथेच थांबण्यास भाग पाडले. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, टीना डाबी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने सांगूनही दरवाजा न उघडल्याने जिल्हाधिकारी संतप्त झाल्या. पोलिसांसह अधिकारी स्पामध्ये गेले असताना अनैतिक कृत्य करणाऱ्या दोन तरुण व पाच मुलींना ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पामध्ये अवैध काम करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. स्पा चालकाने दरवाजा न उघडल्याने प्रशासनाला आक्रमक व्हावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरोपींची अधिक चौकशी केली जात आहे.