Tipu Sultan: कर्नाटक सरकारचा निर्णय! शालेय अभ्यासक्रमातून टिपू सुलतानचा इतिहास काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 02:40 PM2022-03-28T14:40:17+5:302022-03-28T14:40:30+5:30
Tipu Sultan: सरकारच्या निर्णयाचा काँग्रेसकडून जोरदार विरोध होत असून, भाजपवर भगवेकरणाचा आरोप केला आहे.
बंगळुरू: कर्नाटकात हिजाबच्या वादानंतर आता शिक्षणाशी संबंधित आणखी एका प्रकरणाने जोर पकडला आहे. राज्यातील शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासात काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी दिली आहे. यामध्ये 18व्या शतकातील शासक टिपू सुलतानशी संबंधित धड्यांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने यावर शिक्षणाचे भगवेकरण केल्याचा आरोप केला आहे.
'टिपू सुलतानबाबत चुकीचा इतिहास दाखवला'
याबाबत सांगताना शिक्षण मंत्री बीसी नागेश म्हणाले की, "आतापर्यंत टिपू सुलतानबद्दल अनेक खोटी माहिती आणि खोटा इतिहास सांगण्यात येत होता. पण, टिपू सुलतानचा खरा इतिहास लोकांना समजावा, यासाठीच शिक्षणात नवीन आणि खरा इतिहासाचा समावेश केला जात आहे. यामुळे मुलांना इतिहासाची योग्य माहिती मिळेल.''
इतिहासातील अनेक बाबी बदलल्या जाणार
कर्नाटक सरकारने तयार केलेल्या समितीच्या अहवालात टिपू सुलतानवरील "वैभवशाली साहित्य" कमी करण्याची शिफारस केली आहे. रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने काही आठवड्यांपूर्वी आपला अहवाल सादर केला आहे. यानंतर राज्य सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. समितीने टिपू सुलतानवरील प्रकरणे कायम ठेवावीत, परंतु त्याचा गौरव करणारा मजकूर कमी करावा, असे सुचवले आहे.
काँग्रेसकडून विरोध
काँग्रेसचे आमदार प्रियांक खड़गे म्हणाले की, "समस्या ही आहे की, ICSE आणि CBSE चा अभ्यासक्रम, विशेषतः इतिहास भाजपच्या नरेटीव्हमध्ये बसत नाही. भाजपवाल्यांनी कधीच ऐतिहासिक संघर्ष किंवा स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला नाही. त्यांना आता इतिहास बदलून, स्वतःचे नाव इतिहासात लिहायचे आहे.'' याशिवाय, काँग्रेस आमदार अजय सिंह यांनीही भाजपवर फूट पाडून राज्य करण्याचा आरोप ठेपला.