बंगळुरु - कर्नाटकमध्ये टिपू सुलतान जयंती साजरी करण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. टिपू सुलतान एक क्रूर शासक होता. तो बलात्कारी होता तसेच अमानुषपणे लोकांच्या हत्या करायचा असे केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटक सरकारला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. टिपू सुलतानच्या जयंतीशी संबंधित कुठल्याही कार्यक्रमात आपल्याला सहभागी करु नये असे त्यांनी कर्नाटक सरकारला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
10 नोव्हेंबरला साज-या होणा-या टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमात आपल्या नावाचा समावेश करु नका असे अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटकचे मुख्य सचिव आणि उपायुक्तांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. क्रूर शासक, बलात्का-याच्या कार्यक्रमात मला निमंत्रित करु नका असे मी कर्नाटक सरकारला कळवले आहे असे हेगडे यांनी टि्वट करुन सांगितले.
हेगडे यांच्या या पत्रावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. हेगडे स्वत: सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी असे पत्र लिहीणे योग्य नाही असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या म्हणाले. टिपू जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्वच केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांना पाठवले जाते. कार्यक्रमाला यायचे किंवा नाही तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे असे सिद्धरमय्या म्हणाले.