मैसुरु- रॉकेटचा जनक म्हणून टीपू सुलतानाची ओळख आहे. युद्धामध्ये रॉकेटचा उपयोग केल्यामुळे टीपू सुलतानाचे नाव इतिहासात कायमचे नोंदले गेले आहे. याच टीपू सुलतानाची १००० रॉकेटस कर्नाटकात सापडली आहेत.
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील बिदनुरु किल्ल्यात हा साठा सापडला आहे. ही रॉकेटस १८ व्या शतकातील आहेत. बिदनुरु किल्ल्यात एका उघड्या विहिरीजवळ उत्खनन सुरु असताना विहिरीत हा रॉकेटसाठा सापडला असून ती टीपूची असावीत असे मत कर्नाटक राज्य पुरातत्व विभागाचे अध्यक्ष आर. शेजेश्वर नायक यांनी व्यक्त केले आहे.
या कोराड्या विहिरीत खाणकाम सुरु केल्यावर तेथे अचानक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दारुचा वास येऊ लागला. रॉकेटची तपासणी करता त्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट, कोळसापूड आणि मॅग्नेशियमची पूड असल्याचे दिसून आले. पुरातत्वशास्त्राचे तज्ज्ञ व कर्मचार्यांच्या १५ जणांच्या समूहाला ही सर्व रॉकेटस विहिरीतून बाहेर काढण्यास ३ दिवस लागले. प्रत्येक रॉकेटची लांबी १२ ते १४ इंच अाहे. आता ही रॉकेटस शिवमोग्गाच्या संग्रहालयात लोकांना पाहाण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. चौथ्या अँग्लो मैसुरु युद्धात टीपू सुलतान श्रीरंगपट्टणम येथे मारला गेला होता.