नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालतील सर्वात ज्येष्ठ असलेले न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर यांनी गुरुवारी ४३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित छोटेखानी समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.६३ वर्षीय ठाकूर यांनी ईश्वराला स्मरत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी, निवृत्त सरन्यायाधीश आणि मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती भवनाने एका निवेदनाद्वारे शपथविधी संपन्न झाल्याची माहिती दिली. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे बुधवारी निवृत्त झाले. न्या. ठाकूर यांचा जन्म ४ जानेवारी १९५२ रोजी झाला असून ते ४ जानेवारी २०१७ रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्याकडे वर्षापेक्षा थोडा जास्त काळ सरन्यायाधीशपदाचा कार्यभार राहील. न्या. ठाकूर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पॉट फिक्सिंग आणि आयपीएलमधील सट्टेबाजी आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट नियामक असलेल्या बीसीसीआयमध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)प.बंगाल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये गाजलेल्या कोट्यवधीच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या तपासाबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला होता.९ एप्रिल २००८ रोजी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनले. १७ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बढती मिळाली होती.
तीरथसिंह ठाकूर ४३ वे सरन्यायाधीश
By admin | Published: December 04, 2015 2:54 AM