काँग्रेसला कंटाळून आपने ३ उमेदवार केले घोषित; इंडिया आघाडीत सर्वकाही ठीक नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:01 AM2024-02-14T10:01:07+5:302024-02-14T10:01:29+5:30
‘आप’ने गुजरातच्या भरूचमधून चैतर वसावा, तर भावनगरमधून उमेशभाई मकवाना यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप आणि प्रचार रणनीतीची चर्चा करण्याऐवजी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये गुंतलेल्या काँग्रेसला कंटाळून मंगळवारी आम आदमी पार्टीने दक्षिण गोवा तसेच गुजरातमधील दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. दिल्लीमध्ये गुणवत्तेच्या आधारावर काँग्रेससाठी एकही जागा सोडता येणार नाही तरीही काँग्रेसचा मान राखण्यासाठी एक जागा देण्याची तयारी ‘आप’चे नेते खासदार संदीप पाठक यांनी दर्शविली.
आम आदमी पार्टीने लोकसभेच्या २६ जागा असलेल्या गुजरातमध्ये ८ जागा लढण्याची तयारी केली असून १८ जागा काँग्रेससाठी सोडण्याची घोषणा केली. ‘आप’ने गुजरातच्या भरूचमधून चैतर वसावा, तर भावनगरमधून उमेशभाई मकवाना यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्याचबरोबर दक्षिण गोवा मतदारसंघातून ‘आप’चे आमदार वेंझी वेगास यांच्या नावाची घोषणा केली.
‘आप’चा अल्टिमेटम
दिल्लीत काँग्रेसने लोकसभेत शून्य, विधानसभेत शून्य आणि महापालिकेत नऊ जागा जिंकल्या असून दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने एक जागा लढवावी, असा प्रस्ताव ‘आप’ने दिला आहे.