लखनौ - बीकेटीच्या एअरफोर्स स्टेशनहून एका लढाऊ विमानाचे चाक चोरी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या दोघांनी रस्सीच्या सहाय्याने बीकेटी एअरबेसमधून लढाऊ विमानाचे चाक चोरले. या विमानाच्या चालकाने (पायलट) आशियाना पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानंतर, पोलिसांनी आशियाना शहीद मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. या फुटेजच्याआधारे चोरट्यांचा तपास सुरू आहे.
बक्शी का ताबाल येथील मिग 21 स्क्वाडनच्या लढाऊ विमानाचे 5 टायर जोधपूर वायूसेना स्टेशनला पाठविण्यात येत होते. 27 नोव्हेंबर रोजी रात्री 2 जवळपास 2 वाजता चालक हेमसिंह रावत आरजे01जीए-3338 ट्रेलर घेऊन टायरची वाहतूक करत होते. हा ट्रेलर शहीद पथ मार्गाद्वारे कानपूरकडे जात होता. त्यावेळी, एसआर हॉटेलजवळ मोठी वाहतूक कोंडी झाल्याने ट्रेलर मार्गावरच थांबविण्यात आला. याच संधीचा फायदा घेऊन ट्रेलरच्या पाठिमागे चालत असलेल्या स्कॉर्पिओमधून दोन चोरटे ट्रेलरमध्ये चढले. आपल्याकडील धारदार हत्याराचा वापर करुन त्यांनी रस्सीने बांधलेले लढाऊ विमानाचे टायर सोडले.
ट्रेलरचालक हेमसिंह यांना भनक लागण्यापूर्वीच या चोरट्यांनी एक टायर स्कॉर्पिओ गाडीत टाकले होते. त्यानंतर, हेमसिंह यांनी तात्काळ 112 नंबर डायल करुन पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रेलर आशियाना पोलीस ठाण्यात नेला. वायूसेना पोलिसांनीही पोलीस ठाण्यात दाखल झाली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून कसून तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक धीरज शुक्ला यांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ट्रेलर उर्वरीत टायर घेऊन जोधपूरकडे रवाना झाला. तेथे वायूसेना पोलिसांकडून हेमसिंह यांची चौकशी करण्यात आली.