Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ आढळल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. तेव्हापासून बालाजी मंदिर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा बालाजी मंदिर चर्चेत आले आहे. याचे कारण, तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाचे नवे अध्यक्ष बीआर नायडू आहेत. त्यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले आहे.
प्रत्येक कर्मचारी हिंदू असावा - नायडूभगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला येथे काम करणारे सर्व कर्मचारी हिंदू समाजातील असावेत, असे टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी म्हटले आहे. तिरुमला येथे काम करणाऱ्या इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यावा, याविषयी सीएम चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारशी बोलणार असल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे.
ही जबाबदारी मला मिळाली हे माझे भाग्य आहे - नायडूतिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली हे आपले भाग्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही मोठी जबाबदारी दिल्याबद्दल बीआर नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आभार मानले आहेत. तसेच, त्यांनी आधीच्या जगन मोहन रेड्डी सरकारवर हल्लाबोल केला. नायडू म्हणाले की, वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुमलामध्ये अनेक अनियमितता झाल्या होत्या. तिरुमला तिरुपती मंदिराचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला.