आंध प्रदेशातील तिरुपतीमधील तिरुमला तिरुपती देवस्थानम हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या देवस्थानाकडे काही लाख कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. मात्र, या मंदिराकडे किती रिझर्व्ह कॅश अर्थात बँक बॅलेन्स आहे, हे मंदिर दर वर्षी किती रुपयांची एफडी करते, हे आपल्याला माहीत आहे का? तर जाणून घेऊयात...
भगवान व्यंकटेश्वराचे हे मंदिर तिरुमला डोंगरांच्या व्यंकटद्री नावाच्या सातव्या डोंगरावर आहे. येथे रोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टकडे एकूण १८ हजार आठशे सतरा कोटी रुपयांचे कॅश रिझर्व म्हणजेच बँक बॅलेन्स आहे. यावर्षी मंदिर ट्रस्टने एक हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयांची एफडी केली आहे.
हे ट्रस्ट गेल्या 12 वर्षांपासून दरवर्षी 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची एफडी करते. मात्र, 2019 मध्ये, कोरोनामुळे अर्पण केलेल्या पैशांमध्ये घट झाली आणि त्या वर्षी मंदिर ट्रस्टने केवळ 285 कोटी रुपयांची एफडी केली होती. बँकांमधील मंदिर ट्रस्टची एकूण एफडी 13,287 कोटी रुपये आहे. तर मंदिराशी संबंधित इतर ट्रस्टनेही बँकांमध्ये 5,529 कोटी रुपयांची एफडी केली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टला एफडीवरील व्याजाच्या स्वरुपात दरवर्षी सोळाशे कोटी रुपये मिळतात. सोन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, मंदिर ट्रस्टने 11 हजार 329 किलो सोने बँकांमध्ये जमा करून ठेवले आहे. बाजारभावाचा विचार केल्यास, या सोन्याची किंमत आज कोट्यवधी रुपयांहून अधिक आहे. तिरुपती मंदिरात भगवान वेंकटेश्वराची पूजा केली जाते, त्यांना श्रीविष्णूंचे एक रूप मानले जाते.