Asaduddin Owaisi On Tirupati Laddu Controversy : तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. या तिरुपती लाडू वादावर धर्मप्रमुखांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत...अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, आता एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आज, बुधवारी (25 सप्टेंबर) तिरुपतीच्या प्रसादाच्या वादावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, तिरुपतीच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. असे झाले असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. आम्हीदेखील या गोष्टीला चुकीचे मानतो. असे घडायला नको होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'भाजप खोटा प्रचार करत आहे'असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी वक्फ दुरुस्ती विधेयकावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, वक्फचा सदस्य मुस्लिम समाजाच्या बाहेरच कसा असू शकतो? वक्फ मालमत्ता ही खासगी मालमत्ता आहे. वक्फ ही सरकारी मालमत्ता असल्याच्या अफवा भाजप पसरवत आहे. वक्फ बोर्डाकडे 10 लाख एकर जमीन असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. हिंदू धर्मात जशी संपत्ती दान केली जाते, त्याचप्रमाणे वक्फमध्येही जमीन दान केली जाते, असे ओवेसी म्हणाले.
ओवेसी पुढे म्हणतात की, केंद्र सरकार म्हणत आहे की, जमीन वक्फ आहे की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. जिल्हाधिकारी हा सरकारी माणूस आहे, मग न्याय कसा मिळणार? हे विधेयक वक्फच्या बाजूने नाही, तर वक्फ रद्द करण्यासाठी बनवले आहे. महाराष्ट्र सरकारने आमची मागणी मान्य न केल्यास आझाद मैदानावर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.