Tirupati Laddu Prasadam Controversy : नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापलं आहे. तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ झाल्याच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
हिंदूंची प्रसादावर मोठी श्रद्धा आहे, मात्र भेसळीच्या बातम्यांमुळे भाविकांमध्ये शंका निर्माण होत आहे, असे रामनाथ कोविंद म्हणाले. तसेच, वाराणसी दौऱ्याचा संदर्भ देत रामनाथ कोविंद म्हणाले, "मी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊ शकलो नाही, पण माझे काही सहकारी मंदिरात गेले होते. त्यांनी मला प्रसाद दिला. त्यावेळी मला तिरुपती मंदिरातील भेसळीची बातमी आठवली. ही समस्या केवळ एका मंदिरापुरती मर्यादित असू शकत नाही, ती प्रत्येक मंदिराची गोष्ट असू शकते."
याचबरोबर, भेसळ हे पाप असल्याचे सांगत रामनाथ कोविंद म्हणाले, "भेसळ हे पाप आहे. हिंदू शास्त्रांमध्ये सुद्धा याला पाप म्हटले आहे. भक्तांसाठी प्रसाद हे श्रद्धेचे प्रतिक असून, त्यातील भेसळ निषेधार्ह आहे." दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या या वक्तव्यानंतर प्रसादातील भेसळीबाबत जनजागृती करून ती रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुसरीकडे, भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनीही तिरुपती लाडूंशी संबंधित वादाची आंध्र प्रदेश सरकारकडे कठोर आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने एकतर विशेष पथक स्थापन करावे किंवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. तसेच, हा थेट हिंदू धर्म आणि श्रद्धांवर हल्ला आहे, जो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुद्धा शोभा करंदलाजे यांनी दिला आहे.
प्रल्हाद जोशी यांनीही व्यक्त केली चिंता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर चिंता व्यक्त केली असून ही बाब अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे. "प्रयोगशाळेचा जो अहवाल समोर आला आहे तो अत्यंत धोकादायक आहे. हा करोडो लोकांच्या विश्वासाचा विषय आहे. चंद्राबाबू नायडूंनी सार्वजनिक केलेल्या या अहवालाची चौकशी झाली पाहिजे, आणि तो खरा असल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई झाली पाहिजे", असे प्रल्हाद जोशी म्हणाले.