Tirupati Prasadam Controversy :आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावरुन मोठा राज्यासह देशात वाद (Tirupati Prasadam Controversy) निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी एका रिपोर्टचा हवाला देत आरोप केला की, तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात महाप्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तूपात गाईच्या आणि डुकराच्या चरबीची भेसळ होती. आता याप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आरोग्यमंत्री काय म्हणाले?जेपी नड्डा म्हणाले की, "मी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी आजच या विषयावर विस्तृत चर्चा केली. त्यांच्याकडे असलेला अहवाल मागवला आहे. आम्ही FSSAI मार्फत चौकशी करू. आम्ही योग्य ती कारवाई नक्री करू," अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, खाद्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीदेखील याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री जे काही बोलले, ती गंभीर चिंतेची बाब आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे."
टीडीपीचा दावा गुजरातच्या आणंद येथे असलेल्या सीएएलएफ या संस्थेकडे देवस्थानात बनविण्यात येणाऱ्या लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाचे नमुने तपासण्यासाठी पाठविले होते. ते नमुने तपासले असता त्यात सीएएलएफला माशापासून बनविलेले तेल व प्राण्याच्या चरबीशी संबंधित लाडू यांचे अस्तित्व आढळून आले असा दावा तेलुगु देसम पक्षाचे प्रवक्ते अनाम वेंकट रमणा रेड्डी यांनी केला होता. त्यांनी सीएएलएफचा अहवालही पत्रकार परिषदेत सादर केला होता. दुसरीकडे, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर आरोप केला.
भाजपची प्रतिक्रियाभारतीय जनता पक्षाचे नेते बंदी संजय कुमार यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले, "हिंदूंसोबत झालेल्या मोठ्या विश्वासघातासाठी देव कधीही क्षमा करणार नाही. लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वाप करणे, तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी यांची पूजा करणाऱ्या हिंदूंच्या आस्थेसोबत करण्यात आलेला मोठा विश्वासघात आहे. इतर समुदायाच्या लोकांना आणि नास्तिकांना कर्मचारी म्हणून आणि टीटीडी बोर्डात सहभागी केल्याने भ्रष्टाचार आणि हिंदूंच्या आस्थेप्रति अनादर वाढेल, अशी चिंता आम्ही यापूर्वीच व्यक्त केली होती."
उपमुख्यमंत्री पवन कल्याण संतापले"तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याने आम्ही सर्वजण खूप हैराण झालो आहोत. तत्कालीन वायसीपी सरकारद्वारे स्थापन झालेल्या टीटीडी बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागलीत. आमचे सरकार कठोर कारवाई करण्यासाठी वचनबद्ध आहे, परंतु हे मंदिरांचे अपवित्रीकरण, जमिनीचे प्रश्न आणि इतर धार्मिक प्रथांशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश टाकते. आता भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 'सनातन धर्म रक्षण बोर्ड' स्थापन करण्याची वेळ आली आहे. यावर राष्ट्रीय पातळीवर सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, मीडिया आणि आपापल्या क्षेत्रातील इतर सर्वांनी चर्चा केली पाहिजे. सनातन धर्माचा कोणत्याही स्वरूपात अपमान करणे थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे," असेही पवन कल्याण यांनी म्हटले.