तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. बरेच जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. व्यंकटेश हे त्यांची पत्नी शांती आणि मुलासोबत तिरुपतीला गेले होते. वैकुंठ एकादशीनिमित्त मंदिरात भव्य दर्शन घेण्यासाठी ते खूप उत्सुक होते. मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा शेवटचा एकत्र प्रवास असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. विशेष दर्शनाचं टोकन मिळविण्यासाठी विष्णू निवासमजवळ रांगेत उभ्या असलेल्या शेकडो लोकांमध्ये व्यंकटेश यांचं कुटुंबही होतं.
टोकनसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि अधिकाऱ्यांनी तिला बाहेर काढण्यासाठी गेट उघडलं. यानंतर, रांगेत उभ्या असलेल्या लोकांना वाटलं की टोकनसाठी गेट उघडले आहे आणि त्यांनी गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केल्याने गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये व्यंकटेश यांची पत्नी शांती देखील होती.
व्यंकटेश एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, "तिरुपतीमधील पोलीस व्यवस्था खूपच वाईट होती. माझी पत्नी रांगेत पुढे उभी होती आणि त्यामुळे आम्हाला ती खाली पडल्याचं कळलंही नाही. चेंगराचेंगरी झाल्यापासून आम्ही तिचा रुग्णालयात शोध घेत होतो पण आम्हाला ती कुठेही सापडली नाही. नंतर एका व्हायरल व्हिडिओमधून आम्हाला तिच्या मृत्यूची माहिती मिळाली."
जिल्हाधिकारी डॉ. एस. व्यंकटेश्वर यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, काउंटरवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही घटना दुर्दैवी होती. अन्न, पाणी, शौचालये, सर्वकाही काळजी घेतली गेली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आज तिरुपतीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील.