नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहमदाबाद येथील जयेश पटेल हा तीस वर्षे वयाचा युवक मेकअप करून ८१ वर्षांचा वृद्ध बनला. त्यासाठी डोईवरचे केस पांढरे केले. डोळ्यांवर जाड काचांचा चष्मा चढविला. खोटा पासपोर्ट तयार केला. मात्र, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या तपासणीत त्याचे बिंग फुटले व स्वप्नाचाही चक्काचूर झाला.
चार महिन्यांपासून जयेश पटेलने नव्या सोंगाची तयारी चालविली होती. जयेशचे डोक्यावरचे केस पांढरे व हातांवरचे केस काळे असल्याचे विमानतळावर तपासणी करणाऱ्या सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. जयेशच्या हातांवरचे केस पांढरे करण्यास मेकअपमन विसरला. हे जयेशच्याही लक्षात आले नाही. सीआयएसएफ अधिकाºयांनी त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली केले. पासपोर्ट व अन्य कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे अधिकाºयांच्या लक्षात आले होते. वयोवृद्ध असल्याचे दर्शविल्याशिवाय व्हिसा मिळणार नाही, असे वाटून इलेक्ट्रिशियन असलेल्या जयेशने अमरिकसिंह या नावाने खोटा पासपोर्ट तयार करून घेतला. जयेशच्या शेजारी राहणाºया कुटुंबातील एक महिला नोकरीसाठी अमेरिकेला गेली होती व ती पूर्वीपेक्षा उत्तम पैसा कमावत होती. तसे त्यालाही कमवायचे होते.
एजंटने जयेशला करोलबागेतील हॉटेलमध्ये मेकअपमनकडे पाठविले. त्याने जयेशच्या डोईवरचे केस, दाढी-मिशीला पांढरा रंग दिला. विमानतळावर व्हीलचेअरने जा असा सल्ला सब-एजंटने दिला. अमरिकसिंह नावाने जयेशला अमेरिकी व्हिसा जरूर मिळाला; पण हातावरील काळ्या केसांनी त्याचा घात केला. जयेश पटेलला मदत करणारा एजंट, सब-एजंट, मेकअपमन सध्या फरार आहेत.