TMC Vs Congress: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले. यातच इंडिया आघाडीमध्ये राहण्यास तयार आहोत, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. यासोबतच काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या स्वबळावरील घोषणेबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीत राहण्यास तयार आहे. आम्ही काँग्रेसला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार आहे, हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. मात्र काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. काँग्रेसला जागा जाहीर करायच्या नसतील तर तसे करण्यास भाग कसे पाडता येईल, असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी केला.
जागावाटपाबाबत ६ महिने काँग्रेसचे मौन
गेल्या वर्षीच्या जूनपासून आम्ही काँग्रेसला जागावाटपाबाबत निश्चिती करण्याबाबत विचारत आहोत. मात्र अद्यापही काँग्रेसने काहीही केलेले नाही. दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आमच्या अध्यक्षांनी काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली होती. आता जानेवारी महिना संपत आला. मार्चमध्ये निवडणुका जाहीर होणार असतील आणि कोणत्या जागेवरून निवडणूक लढवायची याबाबत माझ्या मनात अजूनही शंका असेल तर ते दुर्दैवी आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, इंडिया आघाडीने माझा एकही प्रस्ताव स्वीकारलेला नाही. अशा स्थितीत आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही पक्षात समन्वय नाही. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत. भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असा एल्गार ममता बॅनर्जी यांनी केला.