कूचबिहार - लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे अनेक प्रकार समोर आले होते. तसेच काही कार्यकत्यांची हत्या झाली होती. कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून शनिवारी भाजपाचे स्थानिक नेते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. तसेच रविवारी अंत्यसंस्कारासाठी बशीरहाट येथील पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती.
पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच सोमवारी (10 जून) भाजपाच्या वतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणुनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपाचे नेता राहुल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राज्य सरकारच्या मनमानी विरोधात सोमवारी बशीरहाटमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच भाजपा संपूर्ण राज्यात काळा दिवस पाळणार आहे.'
पश्चिम बंगालमध्ये भाजपा व टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद वाढत आहे. शनिवारी परगना जिल्ह्यामध्ये पार्टीचे झेंडे काढून फेकल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली असल्याचा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. तर 18 जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तृणमुल काँग्रेसनेही त्यांच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. कुचबिहारमधील पेटला बाजारा परिसरात बुधवारी (5 जून) एका कार्यकर्त्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच भाजपाने ही हत्या केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केलं असून, दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच हन्सखली पोलीस स्टेशनचे ठाणेकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्यजीत बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नाडिया जिल्ह्यात ही घटना घडली होती. सरस्वती मातेची पूजा सुरू असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.