नवी दिल्ली - बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रियो यांनी भाजपाशी (BJP) संबंध तोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात संधी दिल्याबद्दल तसंच पक्षात महत्त्वाच्या भूमिका दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. तसेच याबद्दल बोलताना ते भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
"भाजपासोबत राजकीय करिअरला सुरुवात केल्याने मी भावूक झालो आहे. मी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला" असं म्हटलं आहे. तसेच सुप्रियो यांनी गेल्या महिन्यात भाजपामधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याने खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं."मी पूर्णपणे राजकारण सोडत आहे. जर मी पक्षाचा भाग नसेन तर ही जागा ठेवणं योग्य नाही असा विचार मी केला" असं देखील बाबुल सुप्रियो यांनी सांगितलं आहे.
तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतरही बाबुल सुप्रियोंनी ममता बॅनर्जींच्या बाजूने आणि भवानीपूरमध्ये भाजपाच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला होता. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो भाजपाचे स्टार प्रचारक होते. परंतु, केंद्रीय मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. टीएमसीमध्ये आल्यानंतर ते भवानीपूर ममता बॅनर्जींचा प्रचार करतील अशी आशा होती. पण, त्यांनी प्रचार करण्यास नकार दिला.
तृणमूल भवनात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना बाबुल सुप्रियो म्हणाले होते की, भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करण्याची माझी इच्छा नाही. भवानीपूरमधील भाजपाच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल माझ्या वकील होत्या. त्या एक लढवय्या महिला आहेत. माझ्या बाजुने त्यांनी अनेक खटले लढवले आहेत. मला त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा नाही.' त्यानंतर आता सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.