नवी दिल्ली - पश्चिम बंगलामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election) भाजपाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र याच दरम्यान राजकारण तापलं असून भाजपा आणि तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी एक जाहीर सभेमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट हात-पाय तोडण्याची धमकी दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांना थेट स्मशानात पाठवू असं म्हटलं आहे.
भाजपा नेत्याने भर सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. सुधारणा झाली नाही तर अशा कार्यकर्त्यांचे हात, पाय तोडू आणि डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयामध्ये पाठवू. जर यानंतरही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर थेट त्यांना स्मशानातच पाठवू" अशी धमकी दिलीप घोष यांनी दिली आहे.
"कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा
दिलीप घोष यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढ असतानाच देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपला, कोरोना व्हायरस नष्ट झाला असं म्हटलं होतं. पश्चिम बंगालमधील हुगळीमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीदरम्यान मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यांना संबोधित करताना घोष यांनी हा अजब दावा केला होता. कोरोना व्हायरस नष्ट झाला अशी घोषणा केली. "काहींना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखं वाटत असेल. मात्र ते कोरोनामुळे नाही तर भाजपाच्या भीतीने आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे. ममता बॅनर्जी विनाकारण लॉकडाऊन लागू करत आहेत. भाजपाने बैठका आणि रॅलींचं आयोजन करू नये यासाठी हे केलं जात आहे" असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.
कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या - दिलीप घोष
दिलीप घोष यांनी याआधीही असा अजब दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला होता. "गोमूत्र प्यायल्याने शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते" असं घोष यांनी म्हटलं होतं. घोष यांनी एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगितले. त्यावेळी त्यांनी गोमूत्र प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असा दावाही केला. तसेच गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत असं देखील म्हटलं होतं. त्यांच्या या अजब सल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
"गायीच्या दुधामध्ये सोनं असतं"
दिलीप घोष यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहे. ते नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी याआधी केला होता. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.