TMC Mamata Banerjee News: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये सामील पक्षांमधील दरी वाढताना दिसत आहे. आताच्या घडीला पश्चिम बंगाल, बिहार येथून भारत जोडो न्याय यात्रा जात आहे. विशेष म्हणजे ज्या भागातून भारत जोडो न्याय यात्रा गेली, तेथील एका भागात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, सीपीआयएम आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी तयार राहावे, अशा सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्रित राहण्याचा संदेश दिला. यानंतर आता काँग्रेस आणि तृणमूलमधील चर्चेची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पदयात्रा काढली आहे. एका कार्यक्रमात बोलताना, तृणमूल काँग्रेस पक्ष राज्यातील लोकांच्या हक्कांसाठी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-सीपीआय(एम)-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र राहायला हवे, असे सांगत तृणमूलच्या विजयाचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा पलटवार
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गात अडथळे निर्माण केल्याचा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला. जर पश्चिम बंगालमध्ये चोरी होत असेल, तर ती होत नाही असे कसे म्हणता येईल? भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना आपण भ्रष्ट म्हणू शकत नाही का? असा खोचक सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
दरम्यान, स्वबळावर लोकसभा निवडणुका लढवण्याच्या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, इंडिया आघाडीने माझा एकही प्रस्ताव स्वीकारलेला नाही. अशा स्थितीत आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही पक्षात समन्वय नाही. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत. भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करू.