स्टॅलिन यांच्याकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित, ममतांच्या भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 08:09 AM2018-12-17T08:09:29+5:302018-12-17T08:10:42+5:30
डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी महाआघाडीकडून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर महाआघाडीतील इतर पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
नवी दिल्ली: डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी महाआघाडीकडून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर महाआघाडीतील इतर पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळीच एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची घोषणा केली. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकीय परिपक्वता सिद्ध केली असून, पंतप्रधान मोदींना हरवण्याची त्यांच्यात ताकद असल्याचंही स्टॅलिन म्हणाले आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर कोलकातात असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याही भुवया उंचावल्या. टीएमसीच्या सूत्रांच्या माहितीनुसार स्टॅलिन यांच्या भूमिकेला पक्षाचं समर्थन नाही.
टीएमसीच्या एका नेत्यानं सांगितलं की, पंतप्रधानपदासाठी कोणाचंही नाव सध्या पुढे करणं स्वागतार्ह नाही. पंतप्रधानपदाच्या नावावर निवडणुकांच्या निकालानंतर शिक्कामोर्तब करण्यात येईल, हे आम्ही पहिलंच सांगितलं आहे. स्टॅलिन यांच्या भूमिकेचा परिणाम भाजपाविरोधात एकजूट होत असलेल्या विरोधी पक्षांच्या एकीवर होणार आहे. काँग्रेस स्वतः पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींचं नाव पुढे करत नसल्यानं इतर पक्ष असे कशाला करत आहेत, असा सवालही त्या टीएमसी नेत्यानं उपस्थित केला आहे. तर इतर विरोधी पक्षही स्टॅलिन यांच्या भूमिकेशी असहमत आहेत. सपा, तेलुगू देसम पार्टी, बसपा, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा स्टॅलिन यांच्या मागणीला पाठिंबा नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.
ममतांनी कमलनाथ यांच्या शपथविधीकडे फिरवली पाठ
ममता बॅनर्जी कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. ममता मध्य प्रदेशला न जाण्याचं कोणतंही कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलेलं नाही. तर टीएमसीकडून खासदार दिनेश त्रिवेदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी विरोधक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.