सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी संदेशखालीतील माता-भगिनींसोबत जे काही केले, ते पाहून संपूर्ण देश दुःखी आणि संतप्त आहे. येथील भगिनी आणि मुलींसोबत त्यांनी अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथे एका विशाल जाहीर सभेला संबोधित करत होते.
मोदी म्हणाले, "संदेशखालीतील भगिनींनी अन्याविरुद्ध आवाज उठवला आणि ममता दीदींकडे मदत मागितली. या बदल्यात त्यांना काय मिळाले? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बंगाल सरकारने आरोपी तृणमूल नेत्याला (शाहजहान शेख) वाचविण्यासाठी सर्व काही केले. तृणमूलच्या राज्यात हा गुन्हेगार नेता जवळपास दोन महिने फरार होता. त्याला वाचवणारे कोणीतरी असलना?
पीएम म्हणाले, भाजप नेत्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांना शाहजहानला अटक करणे भाग पडले. आज बंगालची जनता मुख्यमंत्री दीदींना विचारत आहे की, संदेशखालीतील पीडित महिलांपेक्षाही आपल्याला काही लोकांची मते अधिक महत्त्वाची झाली आहेत?
संदेशखाली घटनेवर विरोधी I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांच्या मौनावरही पंतप्रधान मोदींनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मला इंडी आघाडीच्या नेत्यांचे आश्चर्य वाटते. इंडी आघाडीचे बडे नेतेही डोळे, कान, तोंड बंद करून संदेशखालीवर गप्प बसले आहेत.