INDIA Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. तर आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तीन कारणे सांगितली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये आघाडी न होण्याची तीन कारणे आहेत, ती म्हणजे अधीर रंजन चौधरी, अधीर रंजन चौधरी आणि अधीर रंजन चौधरी. भाजपा आणि अधीर रंजन चौधरी या दोघांनीच आघाडीविरोधात वारंवार विधाने केली. बोलत तेच होते, पण शब्द दिल्लीत बसलेल्या दोघांचे होते. गेल्या दोन वर्षांत अधीर रंजन चौधरी भाजपाची भाषा बोलत आहेत. पश्चिम बंगाल केंद्रीय निधीपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी एकदाही उपस्थित केला नाही, या शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केला.
भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलवर ईडीची कारवाई झाली तेव्हा अधीर रंजन चौधरी यांनी याचे समर्थन केले. ममता बॅनर्जींचा अपमान करण्यासाठी ते विशेष पत्रकार परिषदा बोलावतात, पण भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत, असा मोठा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकांनंतर, काँग्रेसने आपले काम योग्य पद्धतीने केले आणि भाजपाला लक्षणीय जागांवर पराभूत केले, तर तृणमूल काँग्रेस राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या आघाडीत पूर्णपणे सामील होईल, असे डेरेक ओब्रायन यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, डेरेक ओब्रायन परदेशातून आले आहेत. त्यांना जास्त कळते. त्यामुळे तुम्ही त्यांनाच काय ते विचार, असे प्रत्युत्तर अधीर रंजन चौधरी यांनी दिले. तसेच अधीर रंजन चौधरी यांनी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली.