कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यर्त्यामधील वैर दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बशीरहाट लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचारात चार भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. भाजपाच्या खासदारांचे दल घटनास्थळाला भेट देणार असून, त्यासंदर्भातील अहवाल गृहमंत्र्यांना दिला जाईल, असे मुकुल रॉय यांनी सांगितले. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुकुल रॉय यांनी सांगितले की, ''तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. आमच्या चार कार्यकर्त्यांची संदेशखली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. टीएमसीचे नेते आणि मुख्यमंत्री दहशतीचे राज्य फैलावत आहेत. यासंदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा, भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय आणि राज्यातील अन्य नेत्यांना कल्पना दिली आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गातून याचा विरोध करू.'' पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कडवे आव्हान दिले होते. दरम्यान, लोकसभेची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर राज्यात झालेली हिंसाचाराची ही पहिलीच मोठी घटवा आहे. संदेशखली बशिरहाट लोकसभा मतदारसंघामधील भाग असून, बशीरहाटमधून नुसरत जहाँ या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
संदेशखली येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येस टीएमसी जबाबदार, मुकुल रॉय यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 10:04 AM