नवी दिल्ली : सोमवारी लोकसभेत राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला धारेवर धरले. यासोबतच तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनीही केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
"मी शेवटच्या वेळी लोकसभेत बोलण्यासाठी उभारले होते, तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. माझा आवाज दाबल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. मला खाली बसवण्याच्या नादात भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी खाली बसवले", असे तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या.
पुढे महुआ मोईत्रा म्हणाल्या, "मी जून २०१९ मध्ये लोकसभेत एक भाषण केले होते. त्यावेळी मी फॅसिझमच्या ७ संकेतांवर भाष्य केलं होतं. सेंगोल हा अधिसत्तेचे प्रमाण असतो. भाजपकडे ३०३ सदस्यांचे क्रूर बहुमत होते, ते आता राहिलेले नाही. आदरणीय राष्ट्रपतींनी भाषण केलं. भारतीय लोकांनी स्थिर सरकार निवडले. पण स्थिर सरकार नाही. भाजप अनेक पक्षांचा आधार घेऊन सत्तेत आलं आहे. भाजप २७२ च्या मॅजिक फिगरपासून ३३ जागांनी दूर आहे", असेही महुआ मोईत्रा यांनी सांगितले.
दरम्यान, ८ डिसेंबर २०२३ रोजी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्याचे आरोप होते. या आरोपांबाबत संसदेच्या समितीने महुआ मोईत्रा यांची चौकशी केली होती. त्या समितीचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर लोकसभा सभागृहात अहवालावर चर्चा झाली. अखेरीस मतदान झाले आणि महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व बहुमताने रद्द करण्यात आले.