माजी रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांचा मुलगा सुभ्रांग्शु रॉय यांनी आपले वडील बेपत्ता झाल्याचा दावा केला आहे. त्यांचे वडील सोमवारी (17 एप्रिल) संध्याकाळी इंडिगोच्या विमानाने दिल्लीला निघाले होते. रात्री 9.55 वाजता ते दिल्लीत उतरणार होते, मात्र अद्याप त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
मुकुल रॉय यांचा मुलगा सुभ्रांग्शु यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या वडिलांशी संपर्क करू शकत नाही. ते बेपत्ता झाले आहेत. सुभ्रांग्शु यांनी सांगितले की, त्यांचे वडील मुकुल रॉय यांच्यासोबत काही वाद झाला होता. त्यानंतर ते निघून गेले आणि त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही.
सुभ्रांग्शु रॉय यांनी दावा केला की, वडील बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी विमानतळ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. मात्र, अद्याप कोणतीही रितसर तक्रार आली नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. सुभ्रांग्शु य़ांनी माहिती दिली की, त्यांच्या पत्नीच्या मृत्यूपासून टीएमसी नेते मुकुल रॉय हे आजाराने त्रस्त आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय हे टीएमसीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. पण पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली टीएमसीने मुकुल रॉय यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली. त्यानंतर ते 2017 मध्ये भाजपामध्ये दाखल झाले आणि 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपाकडून विजय मिळवला. मात्र, त्यानंतर ते टीएमसीमध्ये परतले. युवक काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मुकुल रॉय यांचेही नाव नारदा स्टिंग प्रकरणात सापडले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"