नवी दिल्ली - योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी अॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीनंतर पुन्हा एकदा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता, बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
महुआ मोईत्रा (TMC Mahua Moitra) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. "स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे.
रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. तर, एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलच फैलावर घेतलं. डॉ. लेलेंसोबतच्या चर्चेचा बाबा रामदेव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, आता अटकेसंदर्भात रामदेव यांनी केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रामदेव बाबांच्या वक्तव्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यावरुन बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या अटकेचा ट्रेंड चालवला जातो, कधी रामदेव ठग असल्याचा ट्रेंड चालवला जातो. त्यांना ट्रेंड चालवू द्या, आता आम्हीही ट्रेंड शिकलो आहोत, आमचा ट्रेंड सर्वात वरी असतो, असे बाबांनी म्हटलंय. तसेच, अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता..., असेही रामदेव बाबा म्हणाले आहेत.