नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदाराची संपत्ती तब्बल 1985.68 टक्क्यांनी वाढली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ज्योत्स्ना मंडी असं या आमदाराचं नाव आहे. मंडी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2016 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 1,96,633 रुपये इतकी होती. 2021 मध्ये ही संपत्ती 41,01,144 वर पोहोचली आहे. ज्योत्स्ना मंडी बंकुरा जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या नेत्यांमध्ये भाजपाच्या सुदीप कुमार मुखर्जी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत तब्बल 228.86 टक्कांनी वाढ झाली आहे. याआधी पुरुलियामधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढून विजय मिळवला होता. मुखर्जी यांनी पाच वर्षांपूर्वी आपली एकूण संपत्ती 11 लाख 57 हजार 945 इतकी असल्याचं सांगितलं होतं. ही संपत्ती 2021 मध्ये 45 लाख 2 हजार 782 इतकी झाली आहे. याशिवाय अनेक उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
तिसऱ्या क्रमांकावर टीएमसीचे आमदार परेश मुर्मू आहेत. मुर्मू यांच्या संपत्तीत तब्बल 246.34 टक्क्यांनी वाढली आहे. त्यांची संपत्ती 11,57,926 वरून वाढून 40,10, 329 रुपये झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे (West Bengal Assembly Election 2021) राजकारण तापलं आहे. सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. विशेषत: भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र आता बंगालमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. बंगालमधील अनेक शहरात रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. भाजपाने बंगालच्या अलीपूरद्वार विधानसभा मतदारसंघात अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लाहिरी यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. एवढेच नव्हे तर आम्ही लाहिरींना उमेदवारच मानत नाही, असं भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावलं. त्यामुळे अखेर पक्षाने लाहिरी यांचं तिकीट कापून जिल्हा महासचिव सुमन कांजीलाल यांना तिकीट दिलं आहे.