नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी ( TMC Abhishek Banerjee) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार (Modi Government) आणि भाजपावर (BJP) हल्लाबोल केला आहे. "येत्या तीन वर्षांत भाजपाला देशाच्या बाहेर काढण्याचं माझं ध्येय आहे" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. "मी भाजपाच्या प्रत्येक मतदारसंघात जाईन आणि तिथून त्यांना हाकलून लावेन" अशी घोषणा देखील अभिषेक बॅनर्जी यांनी केलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुका होत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात देखील पोटनिवडणूक होत आहे. यादरम्यान, मुर्शिदाबाद मतदारसंघात प्रचार करताना अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाला देशाबाहेर काढण्याचं लक्ष्य असल्याचं जाहीर केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये अभिषेक बॅनर्जी प्रचार करत होते. या ठिकाणी मुर्शिदाबाद-समशेरगंज आणि जांगीपूर या दोन ठिकाणी 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान उमेदवाराचाच मृत्यू झाल्यामुळे या मतदारसंघातली निवडणूक स्थगित करण्यात आली होती. तिथे आता पोटनिवडणूक घेतली जात आहे.
"भाजपाचा विकास हा फक्त नावं बदलण्यापुरताच मर्यादित"
"येत्या तीन वर्षांत भाजपाला देशाबाहेर काढण्याचं माझं लक्ष्य आहे. मी भाजपाच्या प्रत्येक मतदारसंघात जाईन आणि तिथून त्यांना हाकलून लावेन. त्यांच्या ईडी आणि सीबीआय माझं काय करून घेणार आहेत?" असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "आम्ही भाजपाचं अस्तित्व असलेल्या प्रत्येक राज्यात जाऊ आणि त्यांच्याशी लढा देऊ" असं देखील ते म्हणाले. "भाजपाचा विकास हा फक्त नावं बदलण्यापुरताच मर्यादित आहे. जर ते इथे जिंकले असते, तर मुर्शिदाबादचं नामकरण मोदीशाहबाद झालं असतं" अशा शब्दांत अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"
काही दिवसांपूर्वी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले होते. अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला होता. "नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेत जे मी बोललो होतो त्याचा पुनरुच्चार करत आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात माझा 10 पैशांचाही संबंध असल्याचं सिद्ध करू शकले तर ईडी किंवा सीबीआय चौकशीची गरज नाही. मी स्वत: सर्वांसमोर फाशी घेईन" असं म्हटलं होतं.