नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसने (TMC) पुन्हा एकदा भाजपा (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek Obrien) यांनी पंतप्रधान मोदींवर पदाच्या दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कोरोना योद्ध्यांचं श्रेय मोदी स्वत: घेत असल्याचं देखील ओब्रायन यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींकडून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे, असं ओब्रायन यांनी म्हटलं आहे. तसेच डेरेक ओब्रायन यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला एक पत्रंही लिहिलं आहे.
कोरोना लसीकरणानंतर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावर तृणमूल काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. कोरोनाच्या संकटात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांचं आणि इतर कोरोना योद्ध्यांचं श्रेय मोदी स्वत: घेत असल्याचं देखील ओब्रायन यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान लस घेतल्यानंतर नागरिकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून एक प्रमाणपत्र जारी करण्यात येत आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यात आला आहे. याशिवाय या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा एक संदेश इंग्रजी आणि हिंदी भाषेतून छापण्यात आला आहे.
"मोदी उघडउघडपणे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचा अवमान करताहेत"
डेरेक ओब्रायन यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ आपल्या पदाचा दुरुपयोगच करत नाहीत तर याद्वारे ते कोरोनाविरुद्ध लस तयार करणाऱ्यांचं श्रेयही हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. ते उघडउघडपणे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचा अवमान करत आहेत. आता निवडणुकांची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारे सरकारच्या लसीकरण प्लॅटफॉर्मवर आपल्या नावाचा प्रचार करू शकत नाहीत किंवा अशा पद्धतीनं श्रेय बळकावू शकत नाहीत" असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक आचारसंहितेचा उघडपणे भंग करत असल्याचा आरोपही ओब्रायन यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सोशल मीडियावर अनेक गोष्टी या अल्पावधीतच व्हायरल होत असतात. तसेच काही हॅशटॅग हे ट्रेडिंगमध्ये असतात. असाच एक हॅशटॅग हा सध्या तुफान व्हायरल झाला असून सध्या तो टॉप ट्रेंडमध्ये आहे. कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. याच दरम्यान अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केली आहे.
...म्हणून "मोदी रोजगार दो" हा हॅशटॅग आहे टॉप ट्रेंडमध्ये; लाखो लोकांनी केलं ट्विट
सोशल मीडियावर मोदी रोजगार दो हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर लाखो लोकांनी ट्विट केलं आहे. अनेकांनी भाजपाने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं त्याचं काय झालं असा प्रश्न विचारला आहे. सर्वसामान्यांसोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच "सुनो जन के मन की बात" असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे. आयएलओच्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर बेरोजगारी 57 टक्क्यांपर्यंत आहेत. तर भारतामध्ये बेरोजगारी ही 47 टक्क्यांपर्यंत आहे.