नवी दिल्ली: तृणमृलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याचे समोर आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील कल्याण बॅनर्जी यांनी या कार्यक्रमातून निशाणा साधला.
मिमिक्री हा मूलभूत अधिकार आहे. मी हे एकदा नाही, तर हजार वेळा करेन. गरज पडली तर भविष्यातही करेन. तुम्ही मला तुरुंगात टाकू शकता, मला मारू शकता, पण ही लढाई आता थांबणार नाही, असं कल्याण बॅनर्जी या कार्यक्रमात म्हणाले. निषेध करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, या पद्धतींमध्ये विनोद सांगण्यापासून ते गाणे गाण्यापर्यंतचा समावेश आहे, असंही कल्याण बॅनर्जींनी यावेळी सांगितले.
धनखड यांनी स्वत:ला शेतकऱ्याचा मुलगा असल्याचं म्हटलं आहे. यावर धनखड यांची जोधपूरमध्ये करोडोंची संपत्ती आहे. दिल्लीत आलिशान फ्लॅट आहे. ते दररोज लाखो रुपयांचा सूट घालतात, असा दावा कल्याण बॅनर्जींनी केला आहे. कल्याण बॅनर्जींच्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. कल्याण बॅनजी म्हणाले की, इतिहासाच्या पानांवर आपले नाव लिहिण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घाईघाईने संसदेची नवीन इमारत बांधली, परंतु त्या बदल्यात त्यांनी खासदारांच्या सुरक्षेशी तडजोड केली. फक्त एका भाजपा खासदाराने त्या २ लोकांना पास दिले होते. त्याला वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले, अशी टीका देखील कल्याण बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर केली.