Mahua Moitra News: संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात लोकसभेच्या नैतिकता समितीपुढे तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची चौकशी करण्यात आली. महुआ मोइत्रा यांच्या संसदीय खात्यावर दुबईतून ४७ वेळा लॉग-इन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी याप्रकरणात मोइत्रांवर आरोप केले होते. मात्र, महुआ मोइत्रा अपात्र ठरू शकतात, असा दावा केला जात आहे. यासाठी एका जुन्या याचिकेचा आधार दिला जात आहे.
महुआ मोइत्रा यांनी नैतिकता समितीसमोर दिलेल्या उत्तरात आपल्या वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला जात असल्याचे म्हटले होते. मी काहीही चुकीचे केलेले नाही, असे मोइत्रा यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी महुआ मोईत्रा यांना सांगितले की, तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर येथे चर्चा होत नाही. तुम्ही तुमच्या संसदीय अधिकारांचा गैरवापर केल्याची चर्चा येथे होत आहे. तसेच, महुआ मोइत्रा यांनी त्या बदल्यात रोख रक्कम मिळाल्याचे आरोप फेटाळून लावले.
महुआ मोइत्रा यांच्यावरही अशाच पद्धतीने निलंबनाची कारवाई होऊ शकते
महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईसाठी २००५ च्या निर्णयाचा हवाला दिला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. असेच एक प्रकरण पूर्वीही घडले होते. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी ११ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या खासदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरही अशाच पद्धतीने निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, जर महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर ते संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. ज्यामुळे महुआ मोईत्रा यांच्यासाठी संभाव्यतः मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोइत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला होता. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनीही मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोइत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले.