नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. कोणतीही मागणी केलेली नसताना घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले असल्याचं मोइत्रा यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना देखील पत्र दिलं आहे. मोइत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा एक फोटो ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महुआ मोइत्रा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव आणि बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे एसएचओ यांच्याकडे आपल्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. पत्रामध्ये मोईत्रा यांनी बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) शुक्रवारी त्यांना दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेटले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे तीन सशस्त्र जवान त्यांच्या घराच्या बाहेर नेमण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात महुआ मोईत्रा यांनी "सशस्त्र जवानांच्या हालचालींवरून असं दिसत आहे की, ते माझ्या हालचालींच्या नोंदी ठेवत आहेत. यातून मला असं जाणवतंय की मी एक प्रकारच्या पाळतीखाली आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क आहे" असं म्हटलं आहे. यासोबतच सुरक्षा काढून घेण्याची देखील मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महुआ मोइत्रा यांनी काही दिवसांपूर्वी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता - मोइत्रा
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चा करताना महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश यांच्या राम मंदिर निर्णयाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. याला भाजपा सदस्यांनी आणि सरकारकडून विरोध करण्यात आला. मात्र, यानंतरही महुआ मोइत्रा यांनी याचा पुनरुच्चार केला होता. रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता, असे महुआ मोइत्रा यांनी म्हटलं होतं. याचबरोबर, महुआ मोइत्रा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, अर्थव्यवस्थेची स्थिती, नवीन कृषी कायदे यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, न्यायव्यवस्था आता पवित्र नाही. याशिवाय, केंद्र सरकारने चुकीची माहिती आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी कुटीर उद्योग बनविला आहे. काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि असत्य याला धैर्य मानतात, असे म्हणत महुआ मोइत्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता.